Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

मनोगत

चंद्र बुडत असताना ये तू वर असताना मोहक तारे जग निजले असताना ये तू दाट धुके पडल्यावर सारे नाजुक वाहत , ही तरुराजी विचलित करतो कोमल वारा स्पर्शित कर हनु तशीच माझी पुलकित कर हा देहच सारा मग लगबग हे उघडत लोचन थरकत थोडी स्पर्शसुखाने मी पाहिनच नीट तुला पण किंचित लाजत चकित मुखाने शांत निरामय जग असताना तरुपर्णांची कुजबुज ऐकत त्याहूनहि पण हळूच , साजणा , सांग तुझे तू मधुर मनोगत ! चंद्र बुडत असताना ये तू वर असताना मोहक तारे जग निजले असताना ये तू दाट धुके पडल्यावर सारे : ना . घ . देशपांडे

सुंदरता

सुंदरतेचे मोहक दारुण घडले दर्शन ओझरतेही तर मग पुढते हे जग बुडते एकच उरते ओढ अशी ही क्षण बघतो जो कुणी बिचारा चिन्मय तारा त्या गगनाची तो वा - यागत जातो वाहत छेडत छेडत तार मनाची नभमुकुरांवर दुरांत दिसते बिंबच नुसते हिचे जुगारी उठतातच तर मग सिंधूवर व्यथित अनावर लहरी लहरी तिमिरामध्ये नीलारुण घन मुकेच नर्तन ही करताना मलय निरंतर करतो हुरहुर सोडत वरवर श्वास पहा ना ! हे श्रावणघन - गर्जित सारे वादळवारे , विद्युतरेषा – ती मिळण्याची विश्वमनाची कैक दिनांची व्यथित दुराशा : ना . घ . देशपांडे

रानराणी

तू पूस डोळ्यातले पूरपाणी रानराणी ! निमिषभर रहा तू त्वरित परत जा तू राहील चित्तातल्या गूढ पानी ही कहाणी करुण हृदयगाने भर नंतर राने दुरात येतील ते सूर कानी दीनवाणी : ना . घ . देशपांडे

अपमृत्यू

होते चढते जीवन : झाली पण माती आता ममतेच्या तुटल्या कोमल ताती आता मरणाचा पडला निर्दय फासा अतृप्तच गेली नवसंसारपिपासा डोळे मिटलेले , पडली मान पहा ही आहे उघडे तोंड , तरी बोलत नाही छाती फुगलेली दिसते उंच जराशी निर्जीव तरी हे धरले हात उराशी अद्याप गताशाच जणू झाकत आहे अद्याप उसासाच जणू टाकत आहे ना . घ . देशपांडे

गरगरा फिरे भिंगरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी ! लय गोड सखूचा गळा : मैनाच म्हणू का तिला ? अंगावर नवती कळा उरावर उडवीत आली सरी . सारखी करी हुरहुरा हाणते सखू पाखरा सावरून पदरा जरा मळाभर फिरते ही साजरी ये पिसाटवारा पुरा ! अन् घाबरली सुंदरा ये माघारी झरझरा मिळाली संगत मोटेवरी ‘ ये जवळ हरिण - पाडसा !’ लावला सूर मी असा ; अन साथ करित राजसा सरकली जवळ जरा नाचरी घेतला सखूचा मुका ( हं – कुणास सांगू नका !) हलताच जराशी मका उडाली वाऱ्यावर बावरी गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी ! ना . घ . देशपांडे

या रामपहारी

तू हळूच येतो , चंद्रा माझ्या मागंऽ ! भयभीत अशी मी कुणीच नाही जागं हे पाठीमागं तुझंच हसरं बिंब अन समोर माझी पिशी साउली लांब या समोर गायी उभ्या गावकोसात हे ढवळे ढवळे ढग वरले हसतात या रामपहारी गारच आहे वारा वर कलला हारा : पाझरते जलधारा मी अधीर झाले : घरी निघाले जाया ही गारठली रे , कोमल माझी काया ! हे माघामधलं हीव : थरकते अंग हुरहुर वाटते कुणीच नाही संग पण हसतो का तू मनात आले पाप ? मी नवती नारी : बघ सुटला थरकाप अन नकोस हासू चंद्रा माझ्या मागं भयभीत अशी मी कुणीच नाही जागं ना . घ . देशपांडे

कधी व्हायचे मीलन

कुठवर पाहू आता वरी आकाश चांदण्याचे जाले , आकाश काळे काळे ? काय पाहू आता खाली भूमी प्रस्तर पाषाणी सागराचे पाणी पाणी ? आसमंत हासे खेळे : भासे निरार्थ पसारा : जीव झाला वारावारा सापडेना वाट कोठे : हारवले देहभान उदासले माळरान भावनेच्या परागांनी लिहियेली गूढ गाणी अंतराच्या पानोपानी आता भागले हे डोळे : भवताली काळी रात : कुठे पाहू अंधारात ? काय नाही दयामाया ? माझे जाळसी जीवन : कधी व्हायचे मीलन ? : ना घ देशपांडे

किशोरी

कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? कलशाशी कुजबुजले कंकण ‘ किणकिण किणकिण रुणझुण रुणझुण ’ कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? चरणगतीत तुझ्या चंचलता मधुर - रहस्य - भरित आतुरता कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? गहन - गूढ - मधुभाव - संगिनी गहन - तिमिरगत चारुरूपिणी कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? अंधारावर झाली भवती तरलित पदसादांची भरती कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? स्वप्नतरल ह्रदयातच या पण का केलेस सताल पदार्पण कुठे चाललीस तू , किशोरी , कुठे चाललीस तू ? : ना घ देशपांडे

मी आले लडिवाळ

“ नांव सांग तव काय आणखी अंतरातला भाव , वनांतरी शिरकांव कशाला ? दूर राहिला गांव ” “ मी नारीची जात आणखी धनवंताची नात : कुळशील अन जात सोडली , जाऊ कशी नगरांत ?” “ उबाळ वाटे बात : घालशी अस्मानाला हात मिळेल का रानांत , साजणी , जिवाजिवाची जात !” “ नागिण मी बेभान : चालले कुठे तरी हे गांन ? उतावीळ हैराण धावते , कुठे केतकीपान ?” “ कुणीकडे फिरणार : अशी तू कोमल आहे नार ; मंजुळवाणी फार बोलशी वीणेवरची तार !” “ वाट अशी खडकाळ , सख्या रे , रात अशी अवकाळ : मी आले लडिवाळ , सख्या , तू कर माझा प्रतिपाळ ! करू नको नाराज , उदारा , कळे न का आवाज ? भूल पडे का आज जीवाला ; जुनाच आहे साज ” “ अधीर उडतो ऊर सारखा , मनी उठे काहूर : हा मैनेचा सूर वाटतो अन चंद्राचा नूर ” “ उदास कासावीस हिंडते – उदास कासावीस : ओळखले नाहीस काय रे , अरे तीच मी – तीच ! वाट अशी खडकाळ , सख्या रे , रात अशी अवकाळ : मी आले लडिवाळ , सख्या , तू कर माझा प्रतिपाळ !” : ना घ देशपांडे