Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

जरी तुझीया सामर्थ्याने

जरी तुझीया सामर्थ्याने ढळतील दीशाही दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. शक्तीने तुझीया दीपुनी तुज करतील सारे मुजरे पण सांग कसे उमलावे ओठातील गाणे हसरे? जिंकील मला दवबिंदू जिंकील तृणाचे पाते अन स्वत:ला वीसरून वारा जोडील रेशमी नाते कुरवाळीत येतील मजला श्रावणातल्या जलधारा सळसळून भिजली पाने मज करतील सजल इशारे रे तुझीया सामर्थ्याने मी कसे मला विसरावे? अन रंगांचे गंधांचे मी गीत कसे गुंफावे? येशील का संग पहाटे किरणाच्या छेडीत तारा; उधळीत स्वरातुनी भवती हळू सोनेरी अभीसारा? शोधीत धुक्यातुनी मजला दवबिंदू होउनी ये तू कधी भीजलेल्या मातीचा मृदु सजल सुगंधीत हेतू! तू तुलाच विसरुनी यावे मी तुझ्यात मज विसरावे तू हसत मला फुलवावे मी नकळत आणि फुलावे पण तुझीया सामर्थ्याने ढळतील दीशा जरी दाही मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. : मंगेश पाडगावकर

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ? ह्रदयात विझला चंद्रमा ... नयनी न उरल्या तारका ... नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा ? अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले ? ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ... मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले ? कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले ! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले . अवघ्या विजा मी झेलल्या , सगळी उन्हे मी सोसली रे बोल आकाशा , तुझे आता किती पण राहिले ? ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले . : सुरेश भट

माझिया गीतांत वेडे

माझिया गीतांत वेडे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे ! आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा ; कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा ! स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षात व्हावी ; इंद्रियांवाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी ! एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला नामयाहाती बनावे हे जिणे गोपाळकाला ! माझियासाठी जगाचे रोज जाते घर्घरावे मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे ! मी तुकयाच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे ; चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे ! ह्याविना काही नको रे एवढे दे पांडुरंगा ! ह्याचसाठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा ! :   सुरेश श्रीधर भट

सर्व ठिकाणीं.

हसताना जीव घेतेस : मग तुझं सांत्वन ,  मग निघायची तयारी ,  मग म्हणतेस , " आज तू हास ,  माझाही जीव जाऊ दे . "  हसतो.  तू शांतपणे गप्प .  अखेर त्यातही मीच मरतो.  मग तुझं लाजणं ,  मग वाऱ्यावर केंस सोडणं ,  उगीच मानेला झटका देणं ,  हज्जार हरकती , हिकमती , हुकमती ,  मधूनच तुझी अस्पष्ट किंकाळी : " अरेरे ! अयाs s ई  ग s s ! कसा रे तो ,  असा कसा तो ? मरणार होता.  मरून चाललं नसतं त्याला : घरी असतील न त्याचे कुणीतरी ! त्यानं जपलं पाहिज स्वतःला .  त्यांनाच का ? सगळ्यांनीच  जपलं पाहिज स्वतःला ... हो s s  प्रत्येकाचं घरी असतंच रे .  असेलच न कुणीतरी?" मग तुझं भान हरपणं ,  डोळ्यातल्या डोळ्यांत रडणं ,  जवळ येणं , मला स्वतःला जपणं  हे हे सगळंच जीवघेणं .  तुला भेटणं : पुन्हां पुन्हां मरणं  घरी , दारी , बाहेर ... शयनीं ,  सर्व ठिकाणीं.  : सर्व ठिकाणी  : नक्षत्रांचे देणे  : आरती प्रभू