दिसा देई कोवळीक देई शोभाही अंधारा गोरजाच्या झळाळीत विलसतो सायंतारा जात्या दिवाकरा काय देव आशीर्वाद देतो येत्या यामिनीच्या भाळी शुभ अक्षत लावितो ? उरी माजता तुफान असा तसा गाजे वारा : त्याच्या दर्शनाने मात्र होतो मंजुळ लेहरा जीव होतो लाही लाही चढे विखार तापांचा त्याच्या दर्शनाने कसा होतो पिसारा चंद्राचा माझे आनंदनिधान तोच एक सायंतारा माझ्या जीवनाचा तोच पूर्णविराम हासरा जिथे असावे तिथून त्याला सन्मुख रहावे डोळा भरून पाहता विश्व नाहीसेच व्हावे : आनंदनिधान : बाहुल्या : इंदिरा संत