Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

कुणी ठेविले भरून

कुणी ठेविले भरून  शब्दाशब्दांचे रांजण : छंद लागला बाळाला  घेतो एकेक त्यांतून .  काही सुबक संगीत , काही पेलती मुळी न , काही जोडतो तोडतो , पाहतोही वाकवून .  शब्द होतात खेळणी : खेळवितो ओठांवर , ध्यानीमनी जे जे त्याला  देऊ पाहतो आकार .  कधी वाटते उणीव  शब्द येईना मनास , घाली पालथे रांजण : शब्दशोधाचा हव्यास  आणि अवचित त्याच्या  ओठावरी शब्द येतो : शब्द त्याचीच घडण : बाळ आनंदे नाहतो .  अशा त्याच्या शब्दासाठी  माझी उघडी ओंजळ : शब्द शब्द साठविले  जसे मेघांना आभाळ.  : कुणी ठेविले भरून  : बाहुल्या  : इंदिरा संत 

प्रारब्धा

प्रारब्धा रे तुझे माझे     नाते अटींचे तटीचे, हारजीत तोलण्याचे ,    प्रारब्धाचे सावधाचे ; फासांतील तुझे पेच,    तुझे अंधारीचे घाव , सोडविणें नि सोसणे     हेच आयुष्याचे नांव.  जाळे फेकून रेशमी     देशी सुखाचे आभास : सुख काचते भोगता :    जीव होतो कासावीस.  जेव्हा कढते दाहक     हृदयींचें रसायन  उधळिशी फुले तेव्हा     कसे निष्ठुर हासून; जिद्द माझीही तशीच :    नाही लावलेली मान , जरी फाटला पदर     तुझे झेलिते मी दान ; काळोखते भोवतालीं ,    जीव येतो उन्मळून  तरी ओठातून नाही     "तुला शरण .... शरण." : प्रारब्धा  : बाहुल्या  : इंदिरा संत 

असे शब्द, असे अर्थ

असे शब्द , असे अर्थ ....     मेघ उदार वाहती,  माझ्या धूळ -पाचोळ्याला     कस्तुरीचे दान देती.  अशा शब्दांचे चंदन     कशी भाळावरी लावू ? चकमकीचे मी फूल     अशी चांदणीशी होऊं ? असे शब्द, असे अर्थ ....    निळे आकाश मंथर, माझ्या दीपकळीसाठी     व्हावें शेल्याचे पाखर .  : असे शब्द, असे अर्थ  : चित्कळा  : इंदिरा संत