Skip to main content

Posts

Showing posts from January, 2010

वचन

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले! एवढे मी भोगले की मज हसावे लागले! ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले! लोक भेटायास आले काधात्या पायांसवे अन् अखेरीस कुशल माझे मज पुसावे लागले! गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कसा होतो मलाही आठवावे लागले! पांगले आयुष्य थकुनी बैसले वाटेवरी जागच्या जागीच मजला परत यावे लागले! एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले; राखरांगोळीस माझ्या गुणगुणांवे लागले! गीत : सुरेश भट

तंद्रि

लाजुन झाले गुलाबी दुःख माझे देखणे; ही तुझी श्वासात आली लाघवी आमंत्रणे! तू पुन्हा आलीस माझ्या पोकळ्या ओठांवरी बांधुनी बेचैन माझ्या स्पंदनांची पैंजणे! रोमरोमांतून गात्रांतून माझ्या चालली सारखी लाडावलेली आपुली संभाषणे! हासती तंद्रित माझ्या आर्जवी डोळे तुझे आज एकांतात बोले पुर्णिमेचे चांदणे! गीत : सुरेश भट

रोज

गात्रागात्राला फुटल्या तुझ्या लावण्याच्या कळ्या; जन्मा वेढून बांधिती तुझ्या भासांच्या साखळ्या! रोज तुझ्या वेणिसाठी डोळे नक्षत्रे खुडती; रोज तुझ्या भेटीसाठी बाहू आसवांचे होती! कवी: सुरेश भट

असेच हे कसे बसे कसे तरी जगायाचे

असेच हे कसे बसे कसे तरी जगायाचे कुठेतरी कधीतरी असायचे नसायचे... असेच सोससोसता हसून हासवायचे; असेच हासहासता हळूच विव्हळायचे असाच रहाणार मी जिता तुरुंग आपला, अशाच बाळगीन मी सुटावयास श्रुंखला असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका कसे बसे तगायचे धरून धीर पोरका अशीच येथली दया हवेत चाचपायची; अशीच जीवनास ह्या पुन्हा क्षमा करायची असाच श्वास तोकडा पुन्हा पुन्हा धरायचा असाच जन्म फाटका पुन्हा पुन्हा शिवायचा असेच पेटपेटूनी पुन्हा पुन्हा विझायचे; हव्याहव्या क्षणासही नको नको म्हणायचे असेच निर्मनुष्य मी जिथेतिथे असायचे; मनात सूर्य वेचुनी जनात मावळायचे गीत : सुरेश भट