तुझीमाझी ताटातुटी अटीतटीची नव्हेच ; फक्त खेळीमेळीची फुलत्या , क्षणाक्षणांची सरत्या ; नव्हेच रागालोभांची भलत्या ; फक्त झोपाळ्याची ग झुलत्या; नव्हेच जन्मजन्मांची सलत्या; फक्त राधेच्या गुण्या गोविंदाची, नव्हे कसल्या बाधेची ... उधळून जावा असा द्यावा असा तुझा माझा संग होता ; भूलत्या ग स्पर्शाचा त्याला भारी गर्व होता ; उधळून जावा असा व्हावा असा उभारीच्या हर्षाचा या दाहीदिशा वारावारा. गांठीगांठी उसवता झाल्या कळ्या उघड्या ग . आणि शुभ्र घागऱ्यांच्या निळ्या किनारींना शिवू आलें इंद्रधनू : पिंगा आला ग उधाणू . माती लाल होतां होता गोऱ्या गोऱ्या देहकळ्या झाल्या ... झाल्या उमलता बावोनियां चोळामोळा : मावळल्या फुगड्या ग . स्वप्ने... स्वप्ने विरघळून जातांना देंठापाशी पाने होती, काठांपाशी रात्र होती ; मने... मने कुस्करून ओसरतां फुलांपाशी फळे होती , पहाटेला फक्त केशरी धुक्यापाशी पळे होती; तूं-मीं मी तूं दूर दूर सरतांना सारें कांही तृप्त होतें, पक्क होतें; हेंहि सारें तुलामला प्राप्त आहे देण्यासाठीं ...