Skip to main content

Posts

Showing posts from October, 2014

|| पालखीचे अभंग ||

विटेवरी देवा | युगे झाली फार |      सोडा पंढरपूर | जगासाठी || किती यावे - जावे   | तुझ्या दारापाशी |     उपाशीतापाशी | आषाढीला || कितीक सांगावी ? दुष्टांची गाऱ्हाणी |     सज्जनांकारणी | कोणी नाही || अमंगल सारे | पोसले जाताना |     तुझा मुकेपना | जीवघेणा || नाही सोसवत | आम्हा हे पाहणे |     सुकृताला जिणे | फासासाठी || सत्य - असत्याचे | तुझे निरुपण |     ऐकताना शीण | आला देवा || आम्हा ठावे आहे | तुझे डोळेपण |     राऊळ सोडोन | पाहा तरी || वैष्णवाचा धर्म | विश्वाकार थोर |     सांगा दारोदार | पांडुरंगा || ... विटेवरी देवा | युगे झाली फार |     सोडा पंढरपूर | जगासाठी ||  -   ना . धों . महानोर

मन चिंब पावसाळी

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा गात्रात कापणारा ओला फिका पिसारा या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे रानात एककल्ली सुनसान सांजवेळी डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले    - ना . धों . महानोर

भुई भेगाळली खोल

भुई भेगाळली खोल , वल्लं र्हाईली न कुटं पाल्या - पाचोळयाचा जीव वहाटुईशी घुस्मटं उभ्या दस्कटाचं रान आयुष्याला भिंगुळवानं मुक्या जात्याच्या बाळूशी ओवी गाते जीवातून सये सुगरनी बाई , तुला कशी सांगू गोष्ट दाट दु : खाचं गाठुडं , शब्द उचलंना वटं माय सुगरनी बाई , देई घरट्याशी थारा असं बेवारशी जीनं सोसवेना उन्हं - वारा    - ना . धों . महानोर

कळत नकळत

मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती मन वा - यावरती झुलते , असे उंच उंच का उडते मग कोणा पाहून भुलते , सारे कळत नकळतच घडते सारे कळत नकळतच घडते कुणितरी मग माझे होईल हात घेउनी हाती मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले पण कसे कळावे कुणी सांगावे आज - उद्या जे घडते जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते वाहत वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते परि पुन्हा पुन्हा मोहरते , सारे कळत नकळतच घडते - अश्विनी शेंडे

ओळख

पापन्यांच्या पलीकडे आहे एक गाव आभाळात कोरलेले दोघींचे नाव दोघींच्या नावाचा बघ आहे तारा आम्ही सांगु त्या दिशी वाहणारा वारा जगुया ना थोडीशी स्वप्ने स्वत : ची घडवूया एक नवी ओळख स्वत : ची

पारिजात

फुल कोवळे शुभ्र से बोलके अबोलसे कुण्या अंगणी झाड कुण्या दारी बहर नाते ओंजळीत गेले सुकुन फार तरी दाराची फुले देती गंध त्यास वेचावे वेचावे चांदणे हातात करतो वेडी माया कुठला पारिजात :  अश्विनी शेंडे

मनाच्या तळ्यावरती

मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले तळहाती तुझ्या - माझ्या सारख्याच रेषा रेषा दोन सावल्यांची जणू एक बोली एक भाषा आभाळाची ओढ लागे उडे मनाचे पाखरू पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच ह्या जन्मी जणू .... : अश्विनी शेंडे