सडा घातला अंगणी , वर रेखिले प्राजक्त , उगवत्या नारायणा जोडिले मी दोन्ही हात . दोन्ही हातांची ओंजळ भक्तीभावे पुढे केली , काय प्राजक्तफुलांनी शिगोशीग ओसंडली ? काही सुचेना , कळेना .... गेले अवघी मिटून , आली फुले ही कोठून ? तन, मन प्रश्नचिन्ह. मनामनाच्या पल्याड , प्रश्नचिन्हाच्या शून्यात , बाई , तिथे देखिले मी एक देखिले अद्भुत . एक कोरलेले लेणें , एक मनस्वी प्राजक्त , एक जुळली ओंजळ आग्रहाच्या वळणांत . तोच काय हा प्राजक्त स्वर्णरंगी मित्र होतो , शुभ्र , केशरी रंगांनी , माझी ओंजळ भरतो . : प्राजक्त : चित्कळा : इंदिरा संत