Skip to main content

Posts

Showing posts from May, 2010

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे

निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे झुबे लालसर ल्यावे कानी ; जरा शीरावे पदर खोचुनी करवंदीच्या जाळीमधुनी. शीळ खोल ये तळरानातून भणभण वारा चढ़णीवरचा; गालापाशी झील्मील लाडीक स्वाद जीभेवर आंबट कच्चा. नव्हती जाणीव आणि कुणाची नव्हते स्वप्नही कुणी असावे; डोंगर चढ़णीवर एकटे किती फीरावे... उभे रहावे. पुन्हा कधी न का मिळायचे ते माझेपण आपले आपण; झुरते तन मन त्याच्यासाठी उरते पदरी तीच आठवण ... निवडुंगाच्या लाल झुब्याची, टपोर हिरव्या करवंदाची ... : इंदिरा संत

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ तरु त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा येवो शिपिंत जीवनाशी निशा काळोखी दडवू द्या जगासी सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा मूक सारे हे साहतो बिचारा तरूवरची हसतात त्यास पाने हसे मूठभर ते गवतही मजेने वाटसरू वाट तुडवीत त्यास जात परी पाचोळा दिसे नित्य शांत आणि अंती दिन एक त्या वनांत येई धावत चौफेर क्षुब्ध वात दिसे पाचोळा घेरूनी तयाते नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे आणि जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी - कुसुमाग्रज