चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे
नाजुक वाहत, ही तरुराजी
विचलित करतो कोमल वारा
स्पर्शित कर हनु तशीच माझी
पुलकित कर हा देहच सारा
मग लगबग हे उघडत लोचन
थरकत थोडी स्पर्शसुखाने
मी पाहिनच नीट तुला पण
किंचित लाजत चकित मुखाने
शांत निरामय जग असताना
तरुपर्णांची कुजबुज ऐकत
त्याहूनहि पण हळूच, साजणा,
सांग तुझे तू मधुर मनोगत!
चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे
: ना. घ. देशपांडे
Comments
Post a Comment