Skip to main content

Posts

Showing posts from 2017

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवर ही सावर ही चांदरात निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस , स्पर्श तुझा पारिजात जाऊ चल परत गडे , जागले न घर अजून पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून तुझिया नयनात चंद्र , माझ्या हृदयी प्रभात चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवर ही सावर ही चांदरात निजलेल्या गावातून आले मी एकटीच दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर श्वास तुझा मालकंस , स्पर्श तुझा पारिजात जाऊ चल परत गडे , जागले न घर अजून पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून तुझिया नयनात चंद्र , माझ्या हृदयी प्रभात : सुरेश भट 

एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई

एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई ... अगदीच हळूवार नको राजरोष पाकळीचं एक नको डवरले घोस पानासाठी कवितेच्या देना खुण काही एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई .... क्षण एक थांब अशी हवीशी होऊन एकदाच मनी तुला घेतो चितारून ! आणि तुझ्या मौनाचीच चित्रावर सही एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई ..... कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई ? :संदीप खरे

झुडूप

काळोखाच्या उताराशी  वाहणारा गूढ झरा  पण पडतां दचके  सश्यासारखा बुजरा  दाट भित्र्या पानांची  गुंग ओलसर हवा  मधूनच तीढी फांदी  गुणगुणते काजवा  डबक्याच्या कपाळाशी  थंड बेढब झूडूप  पडे  बेडूक होऊन  डोळे मिटून गुडूप  : झुडूप  : उत्सव  : मंगेश पाडगावकर 

संध्याकाळी

संध्याकाळी  वाट तुझ्यासारखीच होते  दाट सावल्यांची  लांबसडक वेणी  तिरकस डोलाने  रुळवीत वक्षावर  आपल्या सामर्थ्याची  असूनही सावध जाणीव  धूसर तंद्रीचा घुंगट घेऊन जाणारी  संध्याकाळी  झाडे तुझ्यासारखीच  लयधुंद , रुपमग्न होतात  ज्यांच्या रंध्रारंध्रात  असते थबकलेले  एक नृत्य  संध्याकाळी  आकाश  तुझ्यासारखे दूर असते ..... दूर नसते .....  असते सांगत काहीतरी डोळ्यांनी  जे कळते ..... आणि कळतही नाही .....  जे नेहमी ठेवते  निळ्या भटक्या तंद्रीत  ज्याला  एक पार्थिव सुगंध असतो  तुझ्या सहवासासारखा.  : संध्याकाळीं  : उत्सव  : मंगेश पाडगावकर 

फुलें

उशालगतची  ती आजारी ... फिकट फुलें  उघड्या डोळ्यांचे  ते खिन्न मिटलेपण  त्या डोळ्यांतील वाटेवर  मिणमिणत्या अंधारी  तू मला दिलेले  कधी न संपणारे  एकाकीपण  बाहेर देवळापाशी  खिन्न दुमडल्या ओठाचे  ते ऊनही  सरतीचे  उशालगतच्या  आजारी ..... फिकट फुलांच्या रंगाचे .....  : फुलें  : उत्सव  : मंगेश पाडगावकर 

प्रथमच माझे शब्द पाहिले

चंद्र उमलत्या सरल्या रात्री  थंड धुके हे आले  निळे कवडसे  शिडे  मालवून  डोळ्यांआड बुडाले  पंख तुटुनिया शीळ  बावरी  ओठांवरती पडली  दुखावल्या चोचीतली गाणीं  अर्ध्यावरती अडली  किती वेळ हा उभा एकटा  अंधारात इथे मी : प्रथमच माझे  शब्द पाहिले  एकांतात रिते मी  : प्रथमच माझे शब्द पाहिले  : उत्सव  : मंगेश पाडगावकर 

नुस्ती नुस्ती रहातात

प्रत्येक झाडाचे  प्रत्येक पक्षी कसले तरी  कसले तरी गाणी गातो  प्रत्येक सूर  पानाइतकाच झाडांनाही  आपला आपला वाटतो  गाणे गातात  देणे देतात  झडून जातात  उडून जातात  झाडे नुस्ती नुस्ती  नुस्ती रहातात .  : नुस्ती नुस्ती रहातात  : दिवेलागण  : आरती प्रभू 

पूर

तुझे गात्र गात्र : पावसाळी रात्र ; सारे क्षेत्र ऐसे  झाले पूरपात्र  माझे दोन्ही डोळे : गाव झोपेतले ; मला नकळत  पुरात बुडाले  हृदयाचे बेट : कुठे त्याची वाट? हातास लागावा  एक तरी काठ ! : पूर  : दिवेलागण  : आरती प्रभू 

शोध

पृथ्वीची फिरती कडा चाटून  कवितेची एक ओळ येते  आयुष्याचा एक दिवस  दानासारखा मागून नेते  स्वतःपासून दूर जाता येते  आरशापर्यंत तेवढेच  हे शरीर आयुष्याने बांधलेले  त्या सूत्रालाही अदृश्य खेच  उभा जन्म पाठीमागचा उगाच  सूर्योदयाचा डोंगर वाटतो  पण संपूर्ण कवितेच्या शोधांतील  तो हि एक सूर्यास्तच असतो .  : शोध  : दिवेलागण  : आरती प्रभू 

दुःख

तळहातावरील एक फोड  गुलाब लावून थंड केला  पण आज फक्त हातांतून  फोड जाऊन गुलाब घळला  ओल्याचिंब पायांतुन  घराच्या  उमलून पसरलेली रात्र  पायऱ्या चुकून घसरलेल्या  जीवाचे दुखते गात्रनगात्र चावऱ्या पापण्यांच्या केसांवरून  चेहरा पांघरू न यावा ! हा वेश आठवणीसारखा  क्षणभरही उतरूं न यावा ! : दुःख  : दिवेलागण  : आरती प्रभू 

मुखरित गेलों

हाक ओठातली । मुखरिता यावी  फुफ्फुसे राहावी । शुद्ध जरा  जाणिवेचा ज्वर । डोळ्यांआड धूर  पाहों नेदी घर । माझे मला  खिडकीत दाणे । ठेवीतसे नेमे  पंखी म्हणे देणे । फिटले रे  समोर पाहिले । आंब्याकडे जेंव्हा  पंखी गार हिर्वा । पक्व फळे  हाक ओठातली । मुखरित गेलों  शांताकार झालो । मूर्तिमंत  : मुखरीत गेलो  : दिवेलागण  : आरती प्रभू 

तू गेल्यावर

ओठावरचे स्वप्निल हासू      फुलाफुलांवर जाते रंगून ; डोळ्यांमधले अधुरे आसू      हळूच भरती मधू कोषांतून ; शब्दांमधले अस्फुट लाघव      रानपाखरे घेतीटिपुनी ; सळसळणारे अन अवखळपण       निळ्या आभाळी जाते उडुनी ; रक्तामधली काळी बिजली      डोहामद्ये जाते मिसळून  असते जे जे तुझ्याचसाठी      तू गेल्यावर जाते उधळून.  - तू गेल्यावर नसते मीही,     नसते माझे ..... माझे काही ;  उरलेली ही अशी कोण मी      माहित मजला नाही .... नाही .  : तू गेल्यावर : मेंदी  : इंदिरा संत 

आला क्षण-गेला क्षण

गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण; गंभीरपणे घडय़ाळ बोले - ‘आला क्षण-गेला क्षण’ घडय़ाळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण; त्याचे म्हणणे ध्यानी घेई - ‘आला क्षण-गेला क्षण!’ कर्तव्य जे तत्पर त्यांचे दृढ नियमित व्हावयास मन, घडय़ाळ बोले आपुल्या वाचे - ‘आला क्षण-गेला क्षण’ कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदयी हाणीत घण, काळ -ऐक! गातो आपुल्याशी ‘आला क्षण-गेला क्षण!’ लवाजम्याचे हत्ती झुलती लक्ष त्यांकडे देतो कोण, मित रव जर हे सावध करती - ‘आला क्षण-गेला क्षण’ आनंदी आनंद उडाला, नवरीला वर योग्य मिळाला! थाट बहुत मंडपात चाले - भोजन, वादन, नर्तन, गान! काळ हळू ओटीवर बोले - ‘आला क्षण-गेला क्षण!’ ‘कौतुक भारी वाटे लोकां दाखविण्या पाहण्या दिमाखा, तेणे फुकटची जिणे होतसे! झटा! करा तर सत्कृतीला!’ सुचवीत ऐसे, काळ वदतसे - ‘क्षण आला, क्षण गेला!’ वार्धक्य जर सौख्यात जावया व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया, तर तरुणा रे! मला वाटते, ध्यानी सतत अपुल्या आण घडय़ाळ जे हे अविरत वदते- ‘आला क्षण-गेला क्षण’ :  केशवसूत