आषाढातील एखादी दुपार असावी. पाऊस घेऊन आलेले श्यामल मेघ मात्र सर्वत्र एकसंध पसरललेले. पण पाऊस नाहीये. थोड्या वेळापूर्वी एक सर येऊन गेलीय. भोवतीच्या झाडावरचे शहारे अजून मावळलेलेसुध्दा नाहीत, तोच दुपारी सर येऊ पाहतेय. ओलसर गंधमय वारा पानापानांतून चवचाल चालीने निघालाय, फांदीफांदीवर मुकाट बसलेले करड्या रंगाचे थवे आणि जवळच असलेल्या पाण्याच्या शांत डोहावरून फक्त एखाद्याच पाखराचे उडत गेलेले चुकार प्रतिबिंब. हे सगळं वातावरणच येतं ते मुळी उरातल्या सार्या संवदेना चेतवीत. सृष्टीचा हा बदलू पाहणारा साज चोरट्या रसिकाच्या कुतूहलानं बघावा. आपलं असं वेगळेपण ठेवू नये. सृष्टीची ही नवलाई आणि आपण यात सीमारेषा ठेवल्या तर मग संपलंच की सारं. वारा होऊन वाहत यायला हवं आणि वाढलेल्या गवतातलं एकुलतं एक पिवळं फुलपाखरू होता होता नव्या उमलणार्या फुलाला स्पर्शता यायला हवं. पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम. ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे, त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरस