तुझ्या भेटीलागी सिद्धता हो सांग मृत्तिकेचे पांग तोडले मी ।। अहंतेचे ऐने सौहृदाचे आर्त जुन्या बाजारात लिलावाले ।। लक्ष संबंधाचे खणले तणाव उध्वस्थ पाडाव धरेवर ।। कीर्द खतावण्या सोडल्या पाण्यात राखल्या गाण्यात नोंदी काही ।। घेणे होते थोडे देण्यास न पार निर्लज्ज नादार जाहलो मी ।। दिवाळखोरीचा देहलीला दीप तेजाची तिरीप तेवढीच ।। चंद्राचे शारद सूर्याचे दहन केले विसर्जन नभामाजी ।। आकाशगंगेत पृथ्वीवर बया माती गेली न्हाया आणली ती ।। जिन्याच्या कुटाशी केली झटापट त्याचे वायफट केरामद्ये ।। देहतेचे सौध मनाची गोपुरे लाल बंदीघरे वासनांची ।। त्यांच्याही दाराशी राजीनामा दिला सहीशिक्का केला करारास ।। पावसाळी घना - परी पूर्ण आता होऊनिया रिता थांबलो मी ।। बिस्मिलाच्या फक्त सनईचे स्वर काही बरोबर घेऊ द्यावे ।। : भेटीलागी : छंदोमयी : कुसुमाग्रज