Skip to main content

Posts

Showing posts from June, 2009

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना कवी - वसंत बापट

अंदाज आरशाचा

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा कवी;  इलाही जमादार

पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण ! पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते कवयित्री - इंदिरा संत

तहान

सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण व्हावे एव्हढे लहान सारी मने कळों यावी असा लागावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी फक्त मोठी असो छाती सारे दुःख मापायला गळो लाज गळो खंत काही नको झाकायला राहो बनून आभाळ माझा शेवटला श्वास मना मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास कवी - म. म. देशपांडे

समिधाच सख्या या

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता, खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता || खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली, नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट तीरावर तुरळक परि अंकुरती वेली || नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली, होईल सावली कुणा, कुणास कहाली, तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास, "या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !" समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा? जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा || कवी - कुसुमाग्रज

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी चंद्रातुन चंद्र बुडाले स्मरणाचा उत्सव जागून जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणु ह्रिदयामागुन माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे कवी - ग्रेस

देतां घेतां...

पुस्तकांतली खूण कराया  दिले एकदा पीस पांढरे;  पिसाहुनि सुकुमार कांहिसे  देतां घेतां त्यांत थरारे.   मेजावरचे वजन छानसे  म्हणुन दिला नाजूक शिंपला;  देतां घेतां उमटे कांही  मिना तयाचा त्यावर जडला.   असेच कांही द्यावे घ्यावे  दिला एकदा ताजा मरवा;  देतां घेतां त्यातं मिसळला  गंध मनांतिल त्याहुन हिरवा.  कवयित्री - इंदिरा संत

ती फुलराणी !

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी; याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत; तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला- "छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ? कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ? तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?" लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी ! आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी; त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल ! जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला; निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ? लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ? या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन, मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं… तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ? त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं… तुमचं लग्न ठरवून झालं ? कोवळेपण हरवून झालं ? देणार काय ? घेणार काय ? हुंडा किती ,बिंडा किती ? याचा मान , त्याचा पान सगळा मामला रोख होता , व्यवहार भलताच चोख होता.. हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं… ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या.. मी तिला विचारलं , तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……. त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला, इराण्याच्या हॉटेलात, चहासोबत मस्कापाव मागवला तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती, देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं? मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटल, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……. मग एक दिवस, चंद्र, सूर्य, तारे, वारे, सगळं मनात साठवलं, आणि थरथरणार्‍या हातांनी , तिला प्रेमपत्रं पाठव

प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,  प्रेमात पडलं की असंच व्हायचं   तिचं बोलणं, तिचं हसणं  जवळपास नसूनही जवळ असणं;  जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं  अचानक स्वप्नात दिसणं !  खटयाळ पावसात चिंब न्हायचं  माझं काय, तुमचं काय  प्रेमात पडलं की असच व्हायचं   केसांची बट तिने हळूच मागं सारली ...  डावा हात होता की उजवा हात होता?  आपण सारखं आठवतो,  प्रत्येक क्षण,  मनात आपल्या साठवतो   ती रुमाल विसरुन गेली !  विसरुन गेली की ठेवून गेली?  आपण सारखं आठवतो,  प्रत्येक क्षण  मनात आपल्या साठवतो   आठवणींचं चांदण  असं झेलून घ्यायचं !  माझं काय, तुमचं काय,  प्रेमात पडलं की असंच व्हायचं   तिची वाट बघत आपण उभे असतो ...  ठरलेली वेळ कधीच टळलेली !  येरझारा घालणंसुद्धा  शक्य नसतं रस्त्यावर,  सगळ्यांची नजर असते  आपल्यावरच खिळलेली   माणसं येतात, माणसं जातात  आपल्याकडे संशयाने रोखून बघतात  उभे असतो आपण  आपले मोजीत श्वासः  एक तास ! चक्क अगदी एक तास !!   अशी आपली तपश्चर्या  आपलं त्राण तगवते  अखेर ती उगवते !   इतकी सहज! इतकी शांत !  चलबिचल मुळीच नाही,  ठरलेल्या वेळेआधीच  आली होती जशी काही !  मग तिचा मंजुळ प्रश्नः  "अय्या! तुम्ही आलात

सलाम

सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकावणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे, सभांचे फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम, भाईयों और बेहेनों स

खाली डोकं, वर पाय !

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं ! अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला, व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला ! तर काय, तर काय? खाली डोकं, वर पाय ! जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं” याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं, भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत, भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत ! तर काय, तर काय? खाली डोकं, वर पाय ! तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास, अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास, तुम्ही म्हणता थांब जरा, आणि होता लांब जरा, तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं, काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !” तर काय, तर काय? खाली डोकं, वर पाय ! भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता, व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता, ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता, ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता ! तर काय, तर काय? खाली डोकं, वर पाय ! कवी - मंगेश पाडगावकर

केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी; किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला, तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला; करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा, करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा! अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना, कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना; तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी, क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं. निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय, म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय! उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला, वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला! म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा, नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा; स्मरा मजबरोबरी परि दयाघना इश्वरा. असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी; जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल, नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल. मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक; चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पड

कणा

‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’. माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा! : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

लागेल जन्मावें पुन्हा...

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी. म्हणतेस तू, "मज आवडे रांगडा सीधेपणा!" विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. कवी - विंदा करंदीकर

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी; प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत! हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं! मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं, दरवळणारं अत्तर जसं इवल्याश्या कुपीत असतं! आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून, गात रहा; आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा. झुळझुळणार्‍या झर्‍याला मनापासून ताल द्या; मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या! इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. कवी – मंगेश पाडगांवकर

मन

मन मृदु नवनीत मन अभेद्य कातळ मन भरली घागर मन रिकामी ओंजळ

देव अजब गारुडी

धरित्रीच्या कुशीमधे बियबियाणं निजली वर पसरली माती जशी शाल पांघरली बीय डरारे भुईत सर्व कोंब आले वर गहिवरलं शेत जसं अंगावरती शहारं ऊनवाऱ्याशी खेळता एका एका कोंबांतून प्रगटली दोन पानं जसे हात ते जोडून टाळ्या वाजवती पानं दंग देवाच्या भजनी जशी करती करुणा होऊ दे रे आबादनी दिसमासा होय वाढ रोप झाली आता मोठी आला पिकाला बहर झाली शेतामध्ये दाटी कशी वाऱ्यानं डोलती दाणे आले गाडी गाडी देव अजब गारुडी देव अजब गारुडी  रचना - संत बहिणाबाई

जे का रंजले गांजले ।

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥ ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥  रचना - संत तुकाराम

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात :

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात :  भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?  छेडिति पानात बीन थेंब पावसाचे,  ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे,  मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.  त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली,  पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली !  रिमझिमते अमृत ते कुठुनि अंतरात ?  हातांसह सोन्याची सांज गुंफताना,  बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना,  कमलापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात.  तू गेलिस तोडुनि ती माळ,  सर्व धागे, फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,  सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ? गीत - वा. रा. कांत

चांद मातला, मातला,

चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ? अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ? अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू गोड गारव्याचा मारा, देह शिरशिरे सारा लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी घाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ? चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू गीत - वसंत बापट

सूर येति विरुन जाति

सूर येति विरुन जाति कंपने वाऱ्यावरी, हृदयावरी या स्वरांचा कोण स्वामी की विदेही गीत देही हाय अनोखी ही आलापी कवळिते मजला उरी बंधनी आहे तरी ही मुक्त झालो आज मी पंख झालो या स्वरांचे विहरतो मेघांतरी शांता शेळके

ऋतु हिरवा

ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा वनि रुजवा युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळ्या अवकाशी, मधुगंधी तरल हवा मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा शांता शेळके

आज हृदय मम विशाल झाले

आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज माझिया किरणकरांनी ओंजळीमधे धरली अवनी अरुणाचे मी गंध लाविले या विश्वाच्या कणाकणांतुन भरुन राहिले अवघे जीवन फुलता फुलता बीज हरपले गीत - शंकर वैद्य

कधी बहर, कधी शिशिर

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे बहर धुंद वेलीवर यावा हळुच लाजरा पक्षी गावा आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधि झाली न कळावी भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे हळुच फुलाच्या बिलगुनि गाली नाजुक गाणी कुणी गायिली आता उरली आर्त विराणी सूरच केविलवाणे जुळली हृदये, सूरहि जुळले तुझे नि माझे गीत तरळले व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे मंगेश पाडगावकर

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ? काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे : मंगेश पाडगांवकर 

धुके दाटलेले उदास उदास

धुके दाटलेले उदास उदास मला वेढिती हे तुझे सर्व भास उभी मूक झाडे, विरागी किनारा झुरे अंतरी अन्‌ फिरे आर्त वारा कुणीही न येथे दिसे आसपास कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ? कुणा शोधिती या उदासीन लाटा ? दिशांतून दाटे तुझा एक ध्यास क्षणी भास होतो तुझे सूर येती जिवा भारुनी हे असे दूर नेती स्मृती सोबतीला असा हा प्रवास  गीत - मंगेश पाडगावकर

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्याजी जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं तरी सिंधु मं

प्रेमास्वरूप आई !

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ? तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी; ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ? गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा, अन्‌ राहिआ कधीचा तान्हा तिचा भुका ना? तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे - जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे; नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते, अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते. नाही जगात झाली आबाळ या जिवाची, तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका. विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही, आईविणे परी मी हा पोरकाच राही. सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे, तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे. आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे ! कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे. किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती, अव्यक्त अश्रुधारा की तीर्ठरूप ओती ! ही भूक पोरक्याची होई न शांत आई पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे ! वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके , देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ? घे ज

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी चला खेळू आगगाडी, झोका उंच कोण काढी ? बाळू, नीट कडी धर झोका चाले खाली वर ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली बोगद्यात गाडी आली खडखड भकभक अंधारात लखलख इंजिनाची पहा खोडी बोगद्यात धूर सोडी नका भिऊ थोड्यासाठी लागे कुत्रे भित्यापाठी उजेड तो दूर कसा इवलासा कवडसा नागफणी डावीकडे कोकण ते तळी पडे पाठमोरी आता गाडी वाट मुंबईची काढी खोल दरी उल्लासाची दो डोक्यांचा राजमाची पडे खळाळत पाणी फेसाळल्या दुधावाणी आता जरा वाटे दाटी थंड वारा वरघाटी डावलून माथेरान धावे गाडी सुटे भान तारखांब हे वेगात मागे मागे धावतात तार खाली वर डोले तिच्यावर दोन होले झाडी फिरे मंडलात रूळ संगे धावतात आली मुंबई या जाऊ राणीचा तो बाग पाहू गर्दी झगमग हाटी- कशासाठी ? पोटासाठी !  गीत - माधव ज्यूलियन

जन पळभर म्हणतिल ’हाय हाय’ !

जन पळभर म्हणतिल ’हाय हाय’ ! मी जाता राहिल कार्य काय ? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल काहि का अंतराय ? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल, कुणा काळजी की न उमटतिल, पुन्हा तटावर हेच पाय ? सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामि लागतिल, उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय ? रामकृष्णही आले, गेले ! त्याविण जग का ओसचि पडले ? कुणी सदोदित सूतक धरिले ? मग काय अटकले मजशिवाय ? अशा जगास्तव काय कुढावे ! मोहि कुणाच्या का गुंतावे ? हरिदूता का विन्मुख व्हावे ? का जिरवु नये शांतीत काय ? : भा रा तांबे 

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या ! कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ? उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ? समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा, भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी, इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ? तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ? खडे मारी कुणी, कुणी हसे, कोणी करी हेवा ! गीत - भा. रा. तांबे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ? तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे गीत - बालकवी

वेडात मराठे वीर दौडले सात !

म्यानातुनि उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, वर आग, आग बाजूंनी, समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात ! दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात ! गीत - कुसुमाग्रज

तिमिरातुनी तेजाकडे ...

तिमिरातुनी तेजाकडे ने दीपदेवा जीवना । ज्योतीपरी शिवमंदिरी रे जागवी माझ्या मना ॥ दे मुक्तता भयहीनता अभिमान दे दे लीनता दे अंतरा शुभदायिनी मलयनिलासम भावना ॥ : वि वा शिरवाडकर 

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दरामध्ये, भक्ती तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी त्याचा कोष किनाऱ्यास कधी दिसणार नाही तुझ्या कृपाकटक्षाने झालो वणव्याचा धनी त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही गीत - कुसुमाग्रज

ही निकामी आढ्यता का ?

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

कधि कधि न अक्षरात...

कधि कुठे न भेटणार कधि न काहि बोलणार कधि कधि न अक्षरात मन माझे ओवणार निखळे कधि अश्रू एक ज्यात तुझे बिंब दिसे निखळे निःश्वास एक ज्यात तुझी याद असे पण तिथेच ते तिथेच मिटुनि ओठ संपणार व्रत कठोर हे असेच हे असेच चालणार  इंदिरा संत

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. गीत -  ग्रेस

मोगरा फुलला

इवलेंसे रोप लाविलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥१॥ मोगरा फुलला मोगरा फुलला । फुलें वेंचितां अतिभारू कळियांसी आला ॥२॥ मनाचिये गुंती गुंइफियेला शेला । बाप रखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥ संत ज्ञानेश्वर

दिस चार झाले मन

दिस चार झाले मन, पाखरू होऊन पानपान आर्त आणि झड बावरून सांजवेळी जेव्हा येई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनईभरून झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता जरी आला इथे ऋतु वसंताचा ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून  गीत - सौमित्र

अजब सोहळा

अजब सोहळा ! अजब सोहळा ! माती भिडली आभाळा ! मुकी मायबाई तिला राग नाही तुडवून पायी तिचा केला चोळामोळा ! किती काळ साहील ? किती मूक राहील ? वादळली माती करी वाऱ्याचा हिंदोळा ! कुणी पाय देता चढे धूळ माथा माणसा रे, आता बघ उघडून डोळा ! मातीची धरती देह मातीचा वरती माती जागवू दे मातीचा जिव्हाळा ! गीत - शांता शेळके

अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगताच, रडताहि तू हसावे ते आज का नसावे, समजावणी पटे ना धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ? चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना ! की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ? रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ? अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! गीत - आ. रा. देशपांडे ’अनिल’ संगीत - कुमार गंधर्व स्वर - कुमार गंधर्व

विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतू बोलून सर्व जावे अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणिक दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! शांता शेळके

व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा? जीवना तू तसा,मी असा! तू मला ,मी तुला पाहिले, एकमेकांस न्याहाळिले; -दुःख माझातुझा आरसा! एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा; -खेळलो खेळ झाला जसा! खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे, -मी तरीही जसाच्या तसा! रंग सारे तुझे झेलुनी, शाप सारे तुझे घेउनी -हिंडतो मीच वेडापिसा! काय मागून काही मिळे? का तुला बात माझे कळे? -व्यर्थ हा अमृताचा वसा (रंग माझा वेगळा)  -सुरेश भट -

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही! एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही! जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे; सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही! कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो; पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही! सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळिले मी; एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही! स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे; एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही! वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिर्‍हाइत; सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही! संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा... लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही! (रंग माझा वेगळा) सुरेश भट

वय निघून गेले

देखावे बघण्याचे वय निघून गेले रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले गेले ते उडुन रंग उरले हे फिकट संग हात पुढे करण्याचे वय निघून गेले कळते पाहून हेच हे नुसते चेहरेच चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले रोज नवे एक नाव रोज नवे एक गाव नावगाव पुसण्याचे वय निघून गेले रिमझिमतो रातंदिन स्मरणांचा अमृतघन पावसात भिजण्याचे वय निघून गेले हृदयाचे तारुणपण ओसरले नाही पण झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले एकटाच मज बघून चांदरात ये अजून चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले आला जर जवळ अंत कां हा आला वसंत? हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले एल्गार - सुरेश भट

यार हो

सूर्य केव्हाच अंधारला यार हो या, नवा सूर्य आणू चला यार हो हे नवे फक्त आले पहारेकरी कैदखाना नवा कोठला यार हो ते सुखासीन संताप गेले कुठे हाय, जो तो मुका बैसला यार हो चालण्याची नको एवढी कौतुके थांबणेही अघोरी कला यार हो जे न बोलायचे तेच मी बोलतो मीच माणूस नाही भला यार हो सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी जीवनाची टळेना बला यार हो हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी? हुंदकाही नसे आपला यार हो ओळखीचा निघे रोज मारेकरी ओळखीचाच धोका मला यार हो लोक रस्त्यावरी यावया लागले दूर नाही अता फैसला यार हो आज घालू नका हार माझ्या गळा (मी कुणाचा गळा कापला यार हो) एल्गार - सुरेश भट

पुण्याई

चंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा चांदण्यावरी ताबा आजकाल चोरांचा लागले न झाडांना दोनचार शिंतोडे नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा मी अजूनही येथे श्वास घेतला नाही (दे सुगंध थोडासा कालच्या फुलोरांचा!) मांडले कुणी येथे आज ताट सोन्याचे? आठवे न रामाला द्रोण रानबोरांचा! मी तुझा क्षणासाठी हात घेतला हाती... कायदा कसा पाळू मी तुझ्या बिलोरांचा? राहिली जगी माझी एवढीच पुण्याई- मी  न सोयरा झालो त्या हरामखोरांचा! एल्गार - सुरेश भट