जलराशीची ओढ अनावर हवीच जर का तुला कळाया , हवेच व्हाया तुजला वाळू कणाकणाने ... तसें झिजाया . - पुण्य न तितुकें असतें गाठीं शापायला तुला तसे पण ; ओघ गोठला जलाशयांतील नभांत उरलें फक्त निळेपण . : नभात उरलें : मृगजळ : इंदिरा संत
रात्र अशी ही जित्यात बुझाती गगनपणाच्या सगळ्या रेषा उरती केवळ पाणथळीतील हिरव्या ओल्या या अभिलाषा रात्र अशी ही खेचीत दावण तबेल्यात मज घेउनी जाते स्वरात मर्मर मला सांगते इथे जिन्याचे सार्थक होते . : रात्र : वादळवेल : कुसुमाग्रज
मी म्हटले होते चंद्र झाला जुना दाखले तयाचे किती द्यायचे पुन्हा परि तुझ्यात भरला चंद्रपणा इतका की- हो अन्य दाखला येथे केवळ गुन्हा : गुन्हा : वादळवेल : कुसुमाग्रज
सुंदरतेचा शोध घ्यावया आलो होतो भेट होतसे परंतु येथे ही करुणाची संसारातिल शिवसुंदर जे त्याच्या भवती आग ठेवली पेरुनी आम्ही ही सरणाची. : आग : वादळवेल : कुसुमाग्रज
वादळाची लाट अशी मुक्त केशकलापाची, अरण्ये नी मध्यरात्र यांच्या स्वैर मिलाफाची , पर्वतांच्या सागरांच्या स्वप्नातील आलापांची आदळता वेलावर पान फूल खाली पडे , आकाशाच्या सारांशाची अनावृत भेट घडे : वादळ-वेल : वादळवेल : कुसुमाग्रज
तोच रस्ता , तें आंगण तेच मेंदीचे कुंपण त्याच झुलणाऱ्या वेली , तेच उत्सुक दालन , त्याच रेखीव पायऱ्या पुढे सारेच अनोखे उभे निरोपाचे शिल्प श्वासाशब्दानें परके एका घोटात गिळून पाय रस्त्यावरी यावे आणि उरल्या रस्त्याचे रस्तेपणचं संपावे : तोच रस्ता : बाहुल्या : इंदिरा संत