अस्तकालचा प्रकाश पिउनी माळावरती पडला वारा धुसर डोहामध्ये नभाच्या एकच आहे मलूल तारा ढगाळलेल्या क्षितिजाखाली अंधुक झाल्या मिलनरेषा अथांग मौनामध्ये हरवल्या धरतीवरच्या जीवनभाषा अस्तगिरीच्या आडोश्याला फणा काढला अंधाराने उंच तरूंच्या स्कंधावरती तटस्थ बसली हिरवी पाने निरवतेला तडे पाडते रातखगांची कोठे साचल खिन्न नदीच्या छातीवरचा थरथरतो भीतीने अंचल श्यामल मेघांचे ऐरावत संथपणे आकाशी भ्रमती चराचरावर पंख पसरुनी वसली आहे विषण्ण नियती या नियतीच्या अधिकाराला आठवणींचा तुझा किनारा उदासतेच्या वेलीवरती माझ्यासाठी असे फुलोरा : आठवण : मराठी माती : कुसुमाग्रज