सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकावणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे, सभांचे फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम, भाईयों और बेहेनों स