शब्द वाऱ्यासाठी, वाऱ्यावर विरून जाण्यासाठीही, शब्द दवाच्या थेंबातल्या चिमुकल्या आकाशासाठी , शब्द झाडाच्या निष्पर्ण एकांतासाठी , शब्द काळोखाच्या काठाशी उमलणाऱ्या फुलासाठी . शब्द जीवापाड जपलेल्या ओझरत्या अंगभेटीसाठी, शब्द पावलांना गुदगुल्या करणाऱ्या कोवळ्या लाटेसाठी, शब्द पाण्याकाठ्च्या चांदण्याच्या देवळासाठी, शब्द गाभारातल्या फुलांच्या ओल्या वासासाठी. शब्द खोल कळलेल्या समजूतदार दुखासाठी, शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी, शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी , शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी शब्द अंतर्यामीच्या निःशब्द साक्षित्वासाठी, शब्द कान्हापुढे मायेने बोबडे होण्यासाठी : मंगेश पाडगावकर