आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी
काय सांगावे नवल
दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता
होती माझीच नातरे
कधी होती डोळे ओले
मन माणसाची तळी
माझे पैलातले हंस
डोल घेती त्याच्या जळी
कशी पांगल्या प्रेयसी
जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली
मणी ओढता ओढता
होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हांसवें
:बा भ बोरकर
Comments
Post a Comment