हसताना जीव घेतेस :
मग तुझं सांत्वन ,
मग निघायची तयारी ,
मग म्हणतेस , " आज तू हास ,
माझाही जीव जाऊ दे . "
हसतो.
तू शांतपणे गप्प .
अखेर त्यातही मीच मरतो.
मग तुझं लाजणं ,
मग वाऱ्यावर केंस सोडणं ,
उगीच मानेला झटका देणं ,
हज्जार हरकती , हिकमती , हुकमती ,
मधूनच तुझी अस्पष्ट किंकाळी :
" अरेरे ! अयाs s ई ग s s ! कसा रे तो ,
असा कसा तो ? मरणार होता.
मरून चाललं नसतं त्याला :
घरी असतील न त्याचे कुणीतरी !
त्यानं जपलं पाहिज स्वतःला .
त्यांनाच का ? सगळ्यांनीच
जपलं पाहिज स्वतःला ... हो s s
प्रत्येकाचं घरी असतंच रे .
असेलच न कुणीतरी?"
मग तुझं भान हरपणं ,
डोळ्यातल्या डोळ्यांत रडणं ,
जवळ येणं , मला स्वतःला जपणं
हे हे सगळंच जीवघेणं .
तुला भेटणं :
पुन्हां पुन्हां मरणं
घरी , दारी , बाहेर ... शयनीं ,
सर्व ठिकाणीं.
: सर्व ठिकाणी
: नक्षत्रांचे देणे
: आरती प्रभू
Comments
Post a Comment