संथ झुलता डोलता होतो मांडीचा शिकारा
निळ्याहिरव्या पाण्यात शिखरांचा तृप्त पारा
एक पाय पाण्यामध्ये एक पाय आईच्या दंडाशी
पहुडला बाळजीव अलमशहाची मिराशी
एक लबाडशी मुठ घेते माऊलीचे सुख
दुज्या मुठीत हिंदोळे सोनमाळेचे कौतुक
हात फिरतो आईचा पालवते अंग अंग
लुब्धावती दोन्ही डोळे ओठी अमृताचा कुंभ
झिरीझिरी पदरात उभा स्वप्नांचा पिसारा
आणि शिकाराला वाटे आता नकोच किनारा
: इंदिरा संत (रंगबावरी)
Comments
Post a Comment