नका मलीन मार्गाचा
सांगू दिमाख मजला
मला आकाश- ज्योतीला
शांत सुखाची शृंखला !
वैर सुस्थिरपणाचे
वैर स्तिथीचे निवान्त
दहा दिशांचा प्रदेश
माझ्या धावेस अशांत
सुख थिजले भिजले
नित्यपणात गंजले
अभिलाषा न अश्याची
स्वैरपणात रंगले !
जातें जळत जाळत
कृष्ण घनांच्या कुशीत
नाच काळोखावरती
कधी करते खुशीत !
माझ्या हातात मशाल
माझ्या मनात निखारा
माझ्या बेहोषपणाला
नाही कोठेही किनारा !
न मी नक्षत्रादिपीका
कोणा देवाच्या पूजेची
राणी सोज्वळ सात्विक
नाही कोणाच्या शेजेची !
मला अनेक वल्लभ
नाही कोणीही भ्रतार
दान दास्यांचे करील
त्यास दाहक कट्यार !
नाही पाखराप्रमाणे
घरकुलात निवास
माझा निःसंग निर्भय
साऱ्या विश्वांत विलास!
सूर्यतेजात चंद्राचे
काही किरण रापले
झंजावाताचे सहस्त्र
वेग तयांत मापले !
माझ्या जन्माची कथा ही
कसे साहीन बंधन ?
तीरांवाचून वाहते
माझे तेजाळ जीवन !
: वीज
: मराठी माती
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment