Skip to main content

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झूंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिलें पाठी

हळूवार नखलीशी पुन: मुलायम पान
निरखीसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते?- गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंग वेडी गाथा

"मी देह विकुनीया मागून घेते मोल,
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल',
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा वि़श्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान...तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथें व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हांसून म्हणाल्यें, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या...' निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे."


: ग. दि. माडगूळकर 

Comments

Popular posts from this blog

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य,आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.

राहु दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारातले गा;
अक्षरा आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळू दे
दे थिजु विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभु दे भाषा शरीरा.

जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्य़ाची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून माते
शब्द तूझा स्पंदनाचे

त्वसृतीचे ओळखू दे
माझिया हाता सुकाणू;
थोर यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची;
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे;

घेऊ दे आघात तीते
इंद्रियद्वारा जगाचे;
पोळू दे आतून तीते
गा अतींद्रियार्थांचे

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परी म्यां
तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!

- बा. सी. मर्ढेकर


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असेजगावेछाताडावरआव्हानाचेलावुनअत्तर नजररोखुनीनजरेमध्येआयुष्यालाद्यावेउत्तर
नकोगुलामीनक्षत्रांचीभीतीआंधळीताऱ्यांची आयुष्यालाभिडतानाहीचैनकरावीस्वप्नांची असेदांडगीईछाज्याचीमार्गतयाला

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  ।
तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।।

शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।।

बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके ।
ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।।

बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।

कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ।।

थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।।

शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती ।
स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।।

शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।।

जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता ।
पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।।

: संत तुकाराम 

disawar satta king