राहिलेली ही फुले घे ; काय म्यां द्यावें दुजें ?
जन्मजन्मीं मी दिलेलें सर्व जे होतें तुझें .
ती गवाक्षांतील शिक्षा , त्या प्रतीक्षा आंधळ्या,
सांध्यछायांच्या किनारी . त्या लकेरी राहिल्या.
प्रीत केली , शुष्क झाली पाकळी अन पाकळी ,
व्यर्थ गेलें मी जळाची गुंफिण्या रे साखळी .
धुपदाणीतील झाला धूर आता कापरा ,
पानजाळीचा फुलेंना शुद्ध आत्ता मोगरा.
हे जुने पोशाख झाले, संपलेली ही तनु,
दागिने उतरुं निघाल्ये, काय मी माझे म्हणू ?
दीप जो तू लाविलेला तो ही मंदावला,
या अखेरी येथ आला पूर - आता वाढला.
राहिलेली ती फुले ने ... काय म्यां द्यावें दुजें ?
त्या प्रवाहांतून गेलें सर्व रे माझे तुझें .
: काय म्यां द्यावें
: नक्षत्रांचे देणे
: आरती प्रभू
Comments
Post a Comment