Skip to main content

स्वप्नाची समाप्ती


स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा.

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशांत
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरांत.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानीं पडे
संपवुनी भावगीत
झोंपलेले रातकिडे.

पहांटचे गार वारे
चोरट्यानें जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर.

शांति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतुन
गजबज गर्जवील
जग घटकेनें दोन !

जमूं लागलेले दंव
गवताच्या पातीवर
भासतें भू तारकांच्या
आसवांनीं ओलसर.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्यांचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशीं
पडे दूर पुष्प-रास
वार्यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास.

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधीं पूर्ती
वेड्यापरी पूजतों या
आम्ही भंगणार्या मूर्ती

खळ्यामध्यें बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यांतील घुंगरांचा
नाद कानीं येऊं लागे.

आकृतींना दूरच्या त्या
येऊं लागे रूप-रङ्ग
हालचाल कुजबूज
होऊं लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.

होते म्हणूं स्वप्न एक
एक रात्र पाहिलेलें
होतें म्हणूं वेड एक
एक रात्र राहिलेले.

प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर.

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडांत दिसूं वेडे
आणि ठरूं अपराधी.

: स्वप्नाची समाप्ती

: विशाखा 
: कुसुमाग्रज 


Comments

Popular posts from this blog

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घे

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती   कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना गहिवर यावा जगास सा - या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर _ गुरु ठाकूर

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।। बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके । ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।। बोलावे बरे । बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।। कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग । जातपात धर्म । काढूच नये ।। थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे । मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।। शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती । स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।। शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल । शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।। जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता । पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।। : संत तुकाराम 
disawar satta king