आता उनाड शब्द वळावयास लागले !
सारे लबाड अर्थ कळावयास लागले !
केले न मी उगीच गुन्हेगार सोबती
आरोप आपसूक टळायास लागले !
आली पुन्हा मनात नको तीच चिंतने ..
काही मवाळ चंद्र ढळायास लागले !
घायाळ मी असून रणी खूप झुंजलो
ज्यांना न घाव तेच पळायास लागले !
माझ्या मिठीत सांग मला पाप कोणते ?
हे चांदणे व्यर्थ चळायास लागले !
माझ्याच झोपडीस कुठे आग लागली ?
सारे गरीब गाव जळाव्यास लागले !
केलास हा सवाल नवा तू कसा मला ?
आता जुने सवाल छळायास लागले !
कोणी नभात सूर्य विकायास काढला ?
येथे प्रसन्न ऊंन्ह मळायास लागले !
आणू तरी कुठून रडायास आसवे ?
डोळ्यामधून रक्त गळायास लागले !
जात्यात गात गात उडी मीच घेतली …
आयुष्य सावकाश दळावयास लागले
Comments
Post a Comment