नवल असे की
निशिगंधाचे फूल तिथे ते मला दिसावे
नवल पुन्हा की
अशा ठिकाणी निशिगंधाचे फूल असावे
सर्वांगाने रात्र पिणाऱ्या
भयाण त्या तळघरात खाली
वरचे पाणी झिरपुनि जेथे
हिरवी डबकी तयार झाली
सर्पकीटकावाचूनि दुसरे
जीवन जेथे व्यक्त ना व्हावे !
काळोखाचे कुजून तुकडे
दर्प जेथल्या हवेत साचे
उजेड गळतो वरून केवळ
मद्य व्हावया अंधाराचे
प्रकाश नाही विकास नाही
सुंदर सारे जिथे मरावे
नवल असे कि अशा ठिकाणी
निशिगंधाचे फूल फुलावे !!
: निशिगंध
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment